जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजेविहिरा, केंद्र – रोहोकडी, तालुका – जुन्नर, जिल्हा – पुणे ही ओतूर गावची भागशाळा असून सह्याद्री डोंगररांगांच्या कुशीत वसलेली आहे. सभोवताली पसरलेली हिरवीगार वनराई, निसर्गरम्य धबधबे, पारंपरिक ठाकर समाजाचे वस्ती-शिवार आणि शेतीप्रधान वातावरण ही या शाळेची खास ओळख आहे.
शाळेत सध्या इयत्ता 1 ली ते 4 थीपर्यंतचे वर्ग चालतात आणि एकूण 63 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बहुतांश विद्यार्थी ठाकर समाजातील असून त्यांच्या पालकांचा व्यवसाय शेती व शेतमजुरी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा पालक आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याची जिद्द बाळगून या शाळेत पाठवतात.
शाळेतील तीन शिक्षक – मुख्याध्यापक माननीय श्री. शरद यशवंत वारुळे, उपशिक्षक श्री. सुरेश भिमाजी रोकडे व श्री. योगेश चंद्रकांत खेत्री – गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
लोकसहभाग, ग्रामपंचायत, पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती जुन्नर तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शाळेने भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थी उपक्रमांमध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. निपुण शाळा, नवसाक्षर अभियान, वाचन कोपरे, परसबाग, वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा, आनंददायी शनिवार अशा अनेक उपक्रमांमुळे शाळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान बनली आहे.
शाळेला शाळा सिद्धी अंतर्गत ‘अ’ श्रेणी मिळालेली असून, आज शाळा एक आदर्श व प्रेरणादायी शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखली जाते.
Vision
“सर्वांगीण शिक्षणाद्वारे सशक्त, नैतिक, सर्जनशील व जबाबदार नागरिक घडविणे.”
आमची दृष्टी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ पुस्तकापुरते शिक्षण न देता जीवनमूल्ये, सामाजिक जाणीव, पर्यावरणाची जपणूक आणि स्वावलंबन यांचा संस्कार करून त्यांना भविष्यासाठी सक्षम करणे.
Mission
1. प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देणे.
2. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक विकासाला चालना देणे.
3. वाचन, लेखन, गणित आणि जीवनकौशल्यांमध्ये प्रावीण्य निर्माण करणे.
4. स्थानिक समाज, पालक व शाळा यांचा सशक्त सहभाग राखून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे.
5. पर्यावरणपूरक उपक्रम, वृक्षारोपण व स्वच्छता यांद्वारे पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे.
6. क्रीडा, सांस्कृतिक व सर्जनशील उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त प्रतिभेला वाव देणे.
7. मुलींमध्ये शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन व स्वावलंबनाचा आत्मविश्वास निर्माण करणे.